Ad will apear here
Next
छत्रपती शिवाजी महाराज रामदास स्वामींना लिहितात – ‘श्री सद्गुरुवर्य श्री सकलतीर्थरूप...’
.समर्थ रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते की नव्हते, यावरून काही काळापूर्वी विनाकारण उलटसुलट चर्चा सुरू करून संभ्रम निर्माण करण्यात येत होता. शिवाजी महाराज मात्र रामदास स्वामींना गुरुस्थानी मानत होते, याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. त्यापैकी एक पुरावा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींना १५ ऑक्टोबर १६७८ रोजी लिहिलेले पत्र. शिवाजी महाराजांच्या जीवनात रामदास स्वामींना काय स्थान होते, हे या पत्रातील आशय तर स्पष्ट करतोच; पण ‘श्री सद्गुरुवर्य श्री सकलतीर्थरूप’ हा राजांनी लिहिलेला पत्राचा मायना वाचल्यावरच साऱ्या शंका दूर होतात. समर्थवाङ्मयाचे गाढे अभ्यासक सुनील चिंचोलकर यांनी संपादित केलेल्या आणि पुण्यातील शिल्पा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘पत्रं समर्थांची’ या पुस्तकातील हे पत्र येथे प्रसिद्ध करत आहोत. समर्थांनी राजांना लिहिलेली, तसेच आणखीही काही पत्रे या पुस्तकात जिज्ञासूंना वाचता येतील.
...........
हे पत्र शिवाजी महाराजांनी १५ ऑक्टोबर १६७८ रोजी समर्थांना लिहिले आहे. ऐतिहासिक दृष्टीने हे पत्र फार महत्त्वाचे आहे. कारण शिवाजी महाराज आणि रामदासस्वामी यांचे संबंध किती जुने आणि प्रेमाचे होते, याची कल्पना त्यावरून येते. ‘राज्य संपादिले, ते चरणी अर्पण करोनु सर्वकाळ सेवा घडावी ऐसा विचार मनी आणिला’ या वाक्यावरून शिवाजी महाराजांनी समर्थांच्या झोळीत राज्य टाकल्याची कथा खरी असली पाहिजे. ‘चाफळी श्रींची पूजा मोहोत्सव ब्राह्मणभोजन यथासांग घडावे,’ या मजकुरावरून शिव-समर्थ भेट चाफळच्या श्रीरामस्थापनेपूर्वी घडली असावी, हे उघड आहे. चाफळचा राम आणि समर्थ स्थापित ११ मारुती या विविध मंदिरांचे उत्सव आणि पूजा-व्यवस्थेसाठी हे दानपत्र शिवाजी महाराजांनी दिले आहे. ११ मारुतींची स्थापना झाल्यावर समर्थांनी आदिलशाही मुलखातील काही भाग राजांकडून दान मागितला. हे दान मागण्यामागे राजकीय संकेत असा होता, की शिवाजी महाराजांनी तो भाग जिंकून घ्यावा. पत्रातील ‘ऐसा संकल्प केला आहे, तो सिद्धीस नेण्याविषयी विनंती केली’ हा भाग वरील कथानकाची आठवण करून  देणारा आहे. ‘जे जे मनी धरिले ते ते स्वामींनी आशीर्वादप्रतापे मनोरथ पूर्ण केले’ या वाक्यावरून एक गोष्ट सिद्ध होते, की शिव-समर्थ संबंध राजांची राजकीय कारकीर्द सुरू झाली, तेव्हापासूनचे आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थांना लिहिलेले गद्य पत्र. याच पत्राला चाफळची सनद असे म्हणतात. 

।।श्री।।

श्री रघुपती
श्री मारुती

श्री सद्गुरुवर्य श्री सकलतीर्थरूप श्री केवल्यधाम श्री महाराज श्री स्वामी, 

स्वामींचे सेवेसी

चरणराज शिवाजीराजे यांनी चरणावर मस्तक ठेवून विज्ञापना जे मजवर कृपा करून सनाथ केले. आज्ञा केली, की तुमचा मुख्य धर्म राज्यसाधन करुनु धर्मस्थापना देवब्राह्मणाची सेवा प्रजेची पीडा दूर करुन पाळण रक्षण करावे हे व्रत संपादून त्यात परमार्थ करावा. तुम्ही जे मनीं धराल ते सिद्धीस पाववील त्याजवरुन जो जो उद्योग केला व दुष्ट तुरुक लोकांचा नाश करावा. विपुल द्रव्य करुनु राज्यपरंपरा अक्षई चालेल ऐशी स्थळे दुर्घट करावी. ऐसे जे जे मनी धरिले तें तें स्वामींनी आशीर्वाद प्रतापे मनोरथ पूर्ण केले. याउपरि राज्य सर्व संपादिले ते चरणी अर्पण करुनु सर्वकाळ सेवा घडावी ऐसा विचार मनी आणिला तेव्हा आज्ञा जाहली की तुम्हास पूर्वी धर्म सांगितले तेच करावेस तीच सेवा होय. ऐसे आज्ञापिले यावरुन निकटवास घडुनु वारंवार दर्शन घडावे श्रीची स्थापना कोठे तरी होऊनु संप्रदाय शिष्य व भक्ती दिगंत विस्तीर्ण घडावी ऐसी प्रार्थना केली ते आसमंतात गिरिगव्हरी वास करुनु चाफळी श्रीची स्थापना करुनु सांप्रदाय शिष्य दिगंत विस्तीर्णता घडली त्यास चाफळी श्रीची पूजा मोहोछाव ब्राह्मणभोजन अतिथी इमारत सर्व यथासांग घडावे. जेथे जेथे श्रीची मूर्तीस्थापना जाहाली तेथे उछाव पूजा घडावी यास राज्य संपादिले. यातील ग्रामभूमी कोठे काय नेमावी ते आज्ञा व्हावी. तेव्हा आज्ञा जाहली की विशेष उपाधीचे कारण काय तथापि तुमचे मनी श्रीची सेवा घडावी. हा निश्चय जाहला त्यास यथा अवकाश जेथे जे नेमावेसे वाटेल ते नेमावे व पुढे जसा सांप्रदायाचा व राज्याचा व वंशाचा विस्तार होईल तैसे करीत जावे. या प्रकारे आज्ञा जाहली यावरुनु देशांतरी सांप्रदाय व श्रीची स्थापना जाहल्या त्यास ग्रामभूमीची पत्रे करुन पाठविली. श्रीसंनिध चाफळी एकशेएकवीस गांव व सर्वमान्य एकशेएकवीस गावी अकरा बिघेप्रमाणे भूमि व अकरा स्थळी श्रीची स्थापना जाहाली तेथे नवेद्यपूजेस भूमी अकरा बिघेप्रमाणे नेमिले आहे. ती ऐसा संकल्प केला आहे तो सिद्धीस नेण्याविषयी विनंती केली तेव्हा संकल्प केला तो परंपरेने सेवटास न्याहावा ऐसी आज्ञा जाहली त्याजवरुन सांप्रत गाऊ व भूमि नेमले.

तपशील - 
(येथे ३३ गावे, ४१९ बिघे जमीन, १ कुरण व १२१ खंडी धान्य यांचा सविस्तर तपशील आहे. विस्तारभयास्तव तो तपशील येथे दिलेला नाही.)

यकूण दरोबस्त सर्वमान्य गाऊ तेहतीस व जमीन बिघे गाऊगना चारशे येकुणिस कुरण येक व गल्ली खडी एकशे एकवीस श्रीचे पूजा उछाहाबद्दल संकल्पातील सांप्रत नेमिले व उछाहाचे दिवसास या इमारतीस नक्ती ऐवज व धान्य समयाचे समयास प्रविष्ट करीन, येणे करोन अक्षई उछाहादि चालविण्याविषयी आज्ञा असावी.

राज्यभिषेक ५ कालयुक्ताक्षी नाम संवत्सरे आश्विन शुद्ध १० दशमी

बहुत काय लिहिणे. हे विज्ञापना.
......

समर्थांनी शिवाजी महाराजांना, संभाजी महाराजांना लिहिलेली, तसेच आणखीही काही पत्रे या पुस्तकात जिज्ञासूंना वाचता येतील.

(‘पत्रं समर्थांची’ हे सुनील चिंचोळकर यांनी संपादित केलेले आणि शिल्पा प्रकाशनाने प्रकाशित केलेले पुस्तक बुकगंगा डॉट कॉमवरून ‘ई-बुक’ स्वरूपात खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZPBCI
Similar Posts
असं हे वैशिष्ट्यपूर्ण कोल्हापूर... ‘रांगडेपणाबरोबर अंगात गुरगुर आणि मस्ती असणारी, रंगेलपणा अन् शौकीनपणाबरोबर जिवाला जीव देणारी, कौतुकाबरोबरच पाय आडवा घालून पाडण्याची तयारी असलेली, लाल मातीशी घट्ट नातं असणारी आणि ‘चैनीत’, ‘निवांत’ असे शब्द खऱ्या अर्थाने जगणारी अघळपघळ मनाची माणसं म्हटलं, की ती कोल्हापूरचीच असणार. दुसरी कुठली?’ समकालीन
मातृभूमीसाठी सावरकरांनी घेतलेली शपथ स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी ‘मारिता मारिता मरेतो झुंजेन’ अशी शपथ घेतली होती. ती त्यांनी खरी करून दाखवली. ‘अभिनव भारत’ ही संघटना सुरू करताना त्यांनी या कार्यात सहभागी होण्यासाठी आपल्यापेक्षा वयाने मोठ्या व्यक्तींनाही कसे मार्गदर्शन केले होते आणि त्यांचे विचार किती स्पष्ट होते, याची झलक दाखविणारा, वि
स्वातंत्र्यवीरांच्या पत्नी... माई सावरकर माई सावरकर म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या तेजोमय जीवनपटामागील स्त्रीशक्ती. आठ नोव्हेंबर हा त्यांचा स्मृतिदिन. त्यांचे त्यागमय आणि स्फूर्तिदायक जीवन उलगडण्यासाठी साधना योगेश जोशी यांनी ‘स्वातंत्र्यवीरांच्या पत्नी - माई सावरकर’ हे पुस्तक लिहिले असून, व्यास क्रिएशन्सने ते प्रकाशित केले आहे. प्रभाकर
बाळासाहेब : एक लेणे...! शिवसेनेचे संस्थापक आणि प्रसिद्ध व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांचा २३ जानेवारी हा जन्मदिन. ज्येष्ठ संपादक भारतकुमार राऊत यांनी जागवलेल्या त्यांच्याबद्दलच्या या आठवणी...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language